!!!!! MPSC Online Study या ब्लॉगवर आपले स्वागत आहे !!!!! सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाकरिता उपयुक्त !!!!! 

Saturday, February 14, 2015

लोकसत्ता  व्यक्तिवेध

FEB 2015

______________________________________

कार्ल जेरासी

2 Feb 2015
महिलांच्या जीवनात लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून क्रांती घडवण्याचे काम करणारे व संततिप्रतिबंधक गोळीचे निर्माते-रसायनशास्त्रज्ञ कार्ल जेरासी यांनी मानवतेवर केलेले उपकार कधीही विसरता येणार नाहीत. त्यांचे सॅनफ्रान्सिस्को येथे नुकतेच निधन झाले. त्या काळात या गोळीला नुसतेच 'पिल' असे म्हटले जात असे. आज आपण आय-पिलपर्यंत प्रगती केली आहे.
 साठ वर्षांपूर्वी जेरासी यांनी संततिप्रतिबंधक गोळी तयार केली, हा त्या काळातील एक मोठा शोध होता व मानवतेला वरदान होते. संततिनियमनाचा सोपा उपाय म्हणून या गोळीकडे बघितले जाते. या गोळीमुळे स्त्रिया म्हणजे मुले जन्माला घालण्याचा कारखाना आहे, हा जो समज होता तो दूर झाला. त्यांच्या आरोग्यालाही वारंवार होणारी बाळंतपणे टळल्याने फायदाच झाला. या गोळीने लैंगिकतेचे राजकारण, समाजकारण बदलले यात शंका नाही. संततिप्रतिबंधाच्या प्रश्नात विज्ञानापेक्षा राजकारणाचा प्रभाव जास्त आहे, असे ते म्हणत असत. 'धिस मॅन्स पिल' या पुस्तकात त्यांनी असे म्हटले होते, की विज्ञान समाजावर कसा परिणाम करू शकते हे या शोधातून आपल्याला समजले.
 बीटल्स, ड्रग संस्कृती, हिप्पी संस्कृती व महिलांच्या स्वातंत्र्य चळवळी जोरात होत्या. त्यामुळे लैंगिक वर्तनातील सुरक्षिततेची हमी हवीच होती, अशा काळात ही गोळी म्हणजे वरदान ठरली नसती तरच नवल. संततिप्रतिबंधक असलेले प्रोजेस्टेरॉन ऑस्ट्रियाच्या लुडविग हाबेरलँट यांनी १९२० मध्ये शोधले होते; पण त्याचा उपयोग संततिनियमनासाठी करण्यात कुणालाही स्वारस्य नव्हते. कार्ल जेरासी यांनी मात्र प्रोजेस्टेरॉनचे संश्लेषण करून १९५१ मध्ये हे स्त्री संप्रेरक संततिनियमनासाठी वापरण्याचे ठरवले. त्यातील नोरेथिनड्रोन हा संततिप्रतिबंधक गोळीत वापरला जाणारा रेणू त्यांनी प्रथम मिळवला. बोस्टनचे औषधशास्त्रज्ञ ग्रेगरी पिन्कस व जॉन रॉक यांचाही त्यात सहभाग होता. कार्ल जेरासी यांचा जन्म १९२३ मध्ये व्हिएन्नात झाला. ते ज्यू ऑस्ट्रियन-बल्गेरियन जोडप्याचे अपत्य होते, ते दोघेही डॉक्टर होते. ज्यू असल्याने त्यांना ऑस्ट्रिया सोडून जावे लागले. नंतर ते बल्गेरियात व तेथून अमेरिकेत स्थायिक झाले. स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेल्यानंतर ते ख्यातनाम वैज्ञानिक व तेथे ते रसायनशास्त्राचे मानद प्राध्यापक बनले. संशोधक असूनही त्यांनी कविता, कादंबऱ्या व नाटके लिहिली. 'अ‍ॅन इमॅनक्युलेट मिसकन्सेप्शन' हे नाटक त्यांनी लिहिले होते. ते कलासंग्राहकही होते, त्यांच्याकडे पॉल क्ली व इतरांची चित्रे होती, ती आता अल्बर्टानियाच्या (व्हिएन्ना) संग्रहालयात आहेत.

रॉय ब्रॅडले/लिओनिद त्युखात्येव 

3 Feb 2015
वयाची पन्नाशी पार केल्यावर 'तरुण असताना मीही..' अशी सुरुवात करण्यात अनेक जण धन्यता मानतात आणि यांपैकी विशेषत: पुरुष तर, 'नाही तर तुम्ही..' अशी शेरेबाजी करून स्वत:चेही हसे करून घेतात. पण पन्नास वर्षे वयाचा ट्रॉय आणि ५८व्या वर्षी, दोन नातवंडेसुद्धा असलेला लिओनिद या दोघांनी, बलूनमधून जपान ते मेक्सिको असे ८४६७ किलोमीटर अंतर कापणारा प्रवास करून वय आणि वृत्ती यांचा संबंध नसतो, हेच पुन्हा सिद्ध केले! तरुण असतानापासून दोघेही आपापल्या देशांत, बलूनमधून पुष्कळ 'उंडारले' होतेच.. पण ती केवळ तरुणपणीची रग नव्हती. बलून-उड्डाणांमागचे शास्त्र दोघांनीही समजून घेतले, प्रावीण्य आणि अभ्यास यांच्या जोरावर ते आपापल्या देशांतील बलून-वीरांच्या संघटनांचे अध्यक्षही बनले आणि बलूनोड्डाणाविषयी होणाऱ्या जागतिक परिषदांमधून अनेकदा भेटल्यावर, एकत्र उड्डाण करायचेच, असे या दोघांनी ठरवले.
यापैकी ट्रॉय अमेरिकेचा, तर लिओनिद रशियन. या दोघांच्या कळत्या वयात, दोघांचेही देश एकमेकांचे वैरीच मानले जात. पण बलूनमधून स्वच्छ आभाळात स्वैर भटकण्याचे स्वातंत्र्य अनुभवल्यानंतर शीतयुद्ध वगैरे खुजेच वाटते हे या दोघांना विशीतच समजले असावे. त्यातच, ट्रॉय पंचविशीत आणि लिओनिद तिशीत असतानापासून शीतयुद्धच विरत जाऊन जगाची आर्थिक फेररचना सुरू झाली. अशा काळात लिओनिदने रशियातील बँकिंग क्षेत्रात स्वत:चा जम बसवला. त्या मानाने ट्रॉय फार शिकला नाही. पण त्याच्या साहसांनीच त्याला आंतरराष्ट्रीय बलून-विश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'माँटगोल्फिअर डिप्लोमा' मिळवून दिला. इकडे रशियात बलुनोड्डाणांत विक्रम म्हणून नोंद झालेली आठ साहसे लिओनिदने करून दाखवली असताना, छोटय़ामोठय़ा विक्रमांची मोजदाद केली तर ट्रॉयच्या नावापुढील संख्या ६० वर गेली!
हे दोघे, 'दहा बाय दहाच्या खोली'पेक्षाही कमी आकाराच्या उघडय़ा खोक्यात पाच दिवस राहत होते. आराम वगैरे जवळपास विसरूनच, संपूर्ण वेळ बलूनखालच्या त्या खोक्याची मार्गक्रमणा नीट होते आहे ना याकडे लक्ष ठेवत होते. जमिनीपासून तब्बल ३० हजार फुटांपर्यंतच्या उंचीवर जायचे, म्हणून दोघांनी घातलेले जाड उबदार पोशाख, सुके अन्नपदार्थ आणि देहधर्मासाठी अगदीच कामचलाऊ व्यवस्था हे या खोक्यातील सामानाचे वजन. खोक्याच्या वर, भगभगीत आगीसह हेलियम वायूवर चालणारा बलून. अशा स्थितीत ते कसे राहिले, त्यांच्या शरीरांनी कसकसा प्रतिसाद दिला, हे क्षणोक्षणी नोंदवणारी व्यवस्थाही कार्यरत होतीच. हे उड्डाण यशस्वी झाले तेव्हा 'हेलियम (गॅस) बलून'मधून सर्वाधिक प्रवास करण्याच्या नोंदीपेक्षाही, त्या दोघांची मैत्री जिंकली!

मृणालिनी मुखर्जी

4 Feb 2015
दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (एनजीएमए) परवाच्या २७ जानेवारीस मृणालिनी मुखर्जी यांच्या १९७८ पासून आजवरच्या शिल्पांचे मोठे सिंहावलोकनी प्रदर्शन सुरू झाले आणि मोजून सात दिवस होत नाहीत तोच त्यांची निधनवार्ता. एनजीएमए असे सिंहावलोकन भरवते तेव्हा शिल्पकाराबद्दल परिसंवाद होतात, समीक्षा होते.. हे सारे ऐकण्याआधीच त्या गेल्या. त्यांचे जाणे चटका लावणारे का आहे, याची साक्ष देण्यासाठी त्यांची शिल्पे मात्र पुढील काही महिने दिल्लीत असतील.
'माझी आई लाकूड कोरून शिल्पे करीत असे.. पण तिच्या या कामाकडे कोणी गांभीर्याने पाहिलेच नाही' हे मृणालिनी यांनी एकदा जाहीरपणे उच्चारलेले वाक्य महत्त्वाचे आहे. चित्रकार बिनोदबिहारी मुखर्जी आणि लीला मुखर्जी या शांतिनिकेतन-वासी दाम्पत्याची मृणालिनी ही कन्या. चित्रे रंगविण्याचे पदवी शिक्षण घेऊनही मृणालिनी शिल्पकार कशा? मृणालिनींच्या शिल्पांमध्ये अस्फुटसा का होईना, पण स्त्रीचा- तिच्या देहाचा नव्हे, तर स्त्रीत्वाचा किंवा स्त्री-तत्त्वाचा भास का होत राहातो? खासगी आयुष्यात त्यांनी एकटे राहणे का पसंत केले?.. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, आईबद्दल मृणालिनींनी सांगितलेल्या त्या एका वाक्याद्वारे मिळू शकतात. वाखाच्या दोराला अनेकानेक गाठी मारून त्यातून शिल्पे घडवण्याचा नवाच मार्ग मृणालिनी यांनी शोधला होता. त्या शिल्पांत गाठींचेच पृष्ठभाग बनत, गोलाईदार वळण घेत हे पृष्ठभाग आत वा बाहेर मुडपून आकार धारण करीत आणि अशा अनेक पृष्ठभागांचे एक शिल्प तयार होई. ही शिल्पे बऱ्याचदा छताला टांगून- पण जमिनीस टेकवून प्रदर्शित केली जात. हे सारे बदलले, ते १९९७ मध्ये हॉलंडच्या एका निवासी पाठय़वृत्तीमध्ये मृणालिनी यांना सिरॅमिक्स माध्यमात भरपूर काम करता आले, तेव्हा! मग सिरॅमिक-शिल्पे घडू लागली, वाखाच्या दोर-शिल्पांचे बहुश: आत वळलेले आकार, आता बाहेर झेपावू लागले.. जणू मृणालिनीच बहिर्मुख झाल्या.
पण अंतर्मुखतेचा गुण मृणालिनींनी खासगी जीवनात कधी सोडला नाही. जवळच्या मित्रमैत्रिणींशी अगदी खुलून हास्यविनोद करणारी ही शिल्पकर्ती, तिच्याबद्दलच्या आदरयुक्त कुतूहलाने संवाद साधू इच्छिणाऱ्यांनाही दाद लागू देत नसे. कलाकृतींबद्दलच्या प्रश्नांना 'मला हे पाहायला आवडतं.. म्हणून करते मी..' हेच त्यांचे उत्तर खरेखुरे, पण अपुरेच वाटे. कला क्षेत्रातील एखाद्या पार्टीमध्ये, धूम्रपान करणाऱ्यांच्या घोळक्यात मृणालिनी येत, तेव्हाही सिगारेट, लायटर या सामग्रीसह त्यांच्या पर्समधून एक अद्भुत चीज निघे- अ‍ॅश ट्रे! तो पितळेचा, बिजागरयुक्त घट्ट झाकणाचा डबीवजा अ‍ॅश ट्रे तळहातावर ठेवून मृणालिनी उभ्या राहात. आपला कुणाला त्रास नको, अशा- एकटीने. पण पासष्टीतच त्यांनी जावे, हे मात्र क्लेशकारकच.

शुभम बॅनर्जी

5 Feb 2015
सिलिकॉन व्हॅलीत उद्योजक बनायला वयाची अट नाही. आपल्या अभिनवशीलतेच्या जिवावर शुभम बॅनर्जी हा अवघा तेरा वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा तिथे आठवीत असतानाच उद्योजक बनला आहे; अर्थातच नफेखोर उद्योजक नाही. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील किफायतशीर मुद्रक त्याने तयार केला आहे. ब्रेल ही दृष्टिहीनांसाठीची लिपी आहे. शुभमच्या या साहसी प्रयोगात त्याला तंत्रज्ञान क्षेत्रातील 'इंटेल कॉर्पोरेशन' या कंपनीनेही साथ दिली आहे. त्याच्या ब्रॅगो लॅबमध्ये या कंपनीने गुंतवणूकही केली आहे. अमेरिकेतील शाळांमध्ये विज्ञान जत्रा होतात, तिथे शुभमने पहिल्यांदा लेगो रोबोटिक संच मांडला होता; दृष्टिहीनांसाठी स्वस्तातील मुद्रकाची ती पूर्वावृत्ती होती. त्याने एकदा आई-वडिलांना असा प्रश्न विचारला की, दृष्टिहीन लोक कसे वाचतात, त्यावर आई-वडिलांनी उत्तर दिले, 'गुगल इट'. मुलाने गुगल केले. त्याला त्यातून असे कळले की, दृष्टिहीनांसाठी असलेला मुद्रक (प्रिंटर) २००० डॉलरला मिळतो. विकसनशील देशात व इतरत्रही दृष्टिहीनांना तो परवडण्यासारखा नव्हता म्हणून त्याने लेगो माइंडस्टॉर्म इव्ही संच तयार केला. तो या वर्षी बाजारात येत आहे, त्याची किंमत अवघी ३५० डॉलर असेल व वजन काही पाऊंड असेल. सध्याचे प्रिंटर हे २० पाऊंड वजनाचे, म्हणजे नऊ किलोचे आहेत. या मुद्रकाने ब्रेल लिपीतील कागदपत्रे छापता येतील. व्यक्तिगत संगणक व इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही ते शक्य होणार आहे, त्याची ब्रेगो २.० ही आवृत्ती इलेक्ट्रॉनिक मजकुराचे ब्रेलमध्ये रूपांतर करू शकते. इंटेल कंपनीत काम करणारे त्याचे वडील निलय बॅनर्जी यांनी सुरुवातीला त्याच्या या प्रकल्पात ३५ हजार डॉलरची गुंतवणूक केली. कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी होण्याइतका तो (कायद्याने) मोठा नाही, म्हणून त्याच्या आई मालिनी बॅनर्जी यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे.
शुभमचा जन्म बेल्जियममध्ये हॅसेल्ट येथे झाला, नंतर तो आई-वडिलांबरोबर कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे आला. डॉन कॅलेजॉन स्कूल येथे त्याचे शिक्षण झाले, नंतर सांता क्लारा येथे मंगोलिया सायन्स अ‍ॅकॅडमीत त्याने प्रवेश घेतला. शुभमच्या मते किफायतशीर तंत्रज्ञान हे सध्या मोठे आव्हान आहे. जगात २८.५ कोटी दृष्टिहीन लोक आहेत व त्यातील ९० टक्के विकसनशील देशात आहेत. त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी त्याने तंत्रज्ञानाचा केलेला वापर हा त्याच्या वैचारिक प्रगल्भतेची साक्ष देणारा आहे.

सर मार्टिन गिल्बर्ट

6 Feb 2015
 इस्रायलमध्ये अनेक दुर्गुण असूनही माझ्या मनात त्या देशाबद्दल खूप आदराचे स्थान आहे. कारण मला वाटते त्या देशाच्या चांगल्या गोष्टींपुढे त्याचे सर्व अवगुण झाकून जातात..' सर मार्टिन गिल्बर्ट यांचे हे उद्गार. ते इतिहासकाराच्या भूमिकेतून आले असे कोणी म्हणणार नाही. पण तरीही त्यांचे महत्त्व कमी होत नाही, याचे कारण त्यामागील गिल्बर्ट यांच्या भावना निसंशय सच्च्या होत्या. आयुष्यभर ज्यूंच्या ससेहोलपटीवर आणि नाझींनी केलेल्या हत्याकांडावर लिहिणारा इतिहासकार त्या समाजाच्या, देशाच्या प्रेमात पडला नसता तर नवलच. त्यामुळेच ब्रिटनने दिलेल्या 'सर'की पेक्षाही त्यांना अप्रूप होते ते इस्रायल सरकारने दिलेल्या डॅन डेव्हिड प्राईजचे. इस्रायललाही त्यांचे कोण कौतुक! ज्यूंचे हत्याकांड घडलेच नाही, ऑशविट्झ वगैरे सर्व थोतांड आहे अशा प्रकारचे षड्यंत्रसिद्धांत मध्य-पूर्वेत लोकप्रिय होत असल्याच्या काळात त्या सर्व काळ्या कालखंडाचा अत्यंत काटेकोर इतिहास लिहिणाऱ्या सर गिल्बर्ट यांच्याबद्दल ज्यूंमध्ये अत्यंत आदराची भावना दिसते. पण केवळ इस्रायलचा, होलोकॉस्टचा वा दुसऱ्या महायुद्धाचा इतिहासकार हीच त्यांची ओळख नाही. जीवनातील फार मोठा काळ त्यांनी या विषयाला अर्पण केला होता.
अधिकृत कागदपत्रे मिळवून ती छापणे महत्त्वाचेच, पण त्यांचा अन्वयार्थ लावून इतिहास रचणे हा भाग तेवढाच महत्त्वाचा. त्यात गिल्बर्ट यांची महारत होती. दुसऱ्या महायुद्धाबद्दलच्या त्यांच्या इतिहासग्रंथाने अभ्यासकांमध्ये खळबळ माजविली होती ती त्यामुळेच. तोवर अज्ञात असलेले इतिहासाचे पैलू त्यांनी त्या पुस्तकातून उलगडून दाखविले होते. त्या पुस्तकाने सर विन्स्टन चर्चिल यांचे पुत्र रँडॉल्फ हे एवढे प्रभावित झाले, की त्यांनी चर्चिल यांच्या चरित्राचे काम त्यांच्यावर सोपविले.
आज चर्चिलवर एवढा अधिकार असलेला इतिहासकार जगात अन्य नाही. १९६६ मध्ये त्यांचे चर्चिलचरित्र आले आणि त्यानंतरच्या २० वर्षांत त्यापुढचे अनेक खंड त्यांनी लिहिले. या एका कामामुळे ते ब्रिटनच्या इतिहासाचेच अविभाज्य भाग बनले. एका इतिहासकाराला असे भाग्य लाभणे ही थोरच गोष्ट. सध्या ते इराकच्या युद्धेतिहासाचे काम करीत होते. ब्रिटनने त्यासाठी त्यांना सगळी अधिकृत कागदपत्रे खुली केली होती. सर जॉन चिल्कॉट यांच्या अध्यक्षतेखालील इराक युद्ध चौकशी आयोगाचेही ते सदस्य होते. ती चौकशी अद्याप सुरूच असताना सर गिल्बर्ट यांचा कर्करोग बळावला आणि मंगळवारी, वयाच्या ७८व्या वर्षी त्यांच्या झालेल्या मृत्यूने ब्रिटनच्या इतिहासाभ्यासाच्या इतिहासातील एक अध्याय संपला.

 डॉ. झाकीर नाईक

7 Feb 2015
वाढता दहशतवाद, धर्माधता यांमुळे जगावर असुरक्षिततेचे सावट दाटलेले आहे. केवळ परधर्माविषयीच नव्हे, तर आपल्या धर्माच्या शिकवणुकीबद्दलही नेमके किंवा पुरेसे ज्ञान नसल्यामुळे पसरलेल्या गरसमजातून धार्मिकतेच्या मुद्दय़ावर अराजकसदृश परिस्थिती पसरू पाहत आहे. अशा परिस्थितीत धर्माविषयीचे गरसमज दूर करून धर्माचरणाचा नेमका अर्थ समजावण्याची गरज ओळखून इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने लोकशिक्षणाचीच एक चळवळ उभी केली. वैद्यकीय पेशात असलेले डॉ. झाकीर नाईक हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष. इस्लाम व अन्य धर्माविषयीचा सखोल अभ्यासक विचारवंत आणि प्रभावी वक्ता म्हणून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. पवित्र कुराणाच्या आधारावर इस्लाम समजावून सांगण्याचे व्रत घेतलेल्या जेमतेम पन्नाशीतील हा अभ्यासक, जगभरातील श्रोत्यांचे शंकासमाधान करण्याच्या हातोटीमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या जवळपास १९ वर्षांपासून डॉ. झाकीर नाईक यांनी जगभरच्या अनेक देशांत जवळपास दोन हजारांहून अधिक जाहीर व्याख्याने दिली आहेत. एप्रिल २०१२मध्ये बिहारमधील किशनगंज येथील त्यांच्या भाषणासाठी तब्बल दहा लाख श्रोत्यांनी हजेरी लावली होती. हा जागतिक विक्रम ठरला आहे.
केवळ मुस्लीम नव्हे, तर अन्य धर्मातील नेत्यांसोबतच्या चर्चासत्रांच्या निमित्तानेही त्यांनी अनेक परिषदांमध्ये भाग घेतला आहे. विज्ञानाच्या अनुषंगाने कुराण आणि बायबल या विषयांवर अमेरिकेतील डॉ. विलियम कॅम्पबेल यांच्यासोबतची त्यांची चर्चा ऐतिहासिक ठरली आहे. िहदुत्ववादातील आणि इस्लाममधील ईश्वर संकल्पना या विषयावर श्री श्री रविशंकर यांच्यासोबतची चर्चा उभय धर्मातील अनेक मान्यवरांनी गौरविली होती. इस्लामिक पर्सनॅलिटी ऑफ २०१३ म्हणून डॉ. नाईक यांना संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष शेख महंमद बिन राशीद अल मक्तौम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुमारे दोन लाख ७२ हजार अमेरिकन डॉलरचा हा पुरस्कार त्यांनी 'पीस टीव्ही नेटवर्क'ला दान केला.
यंदाच्या किंग फैझल आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी बुधवारी जाहीर झालेली निवड हा त्यांच्या इस्लामच्या सेवेचा अत्युच्च गौरव मानला जातो. मक्केचे गव्हर्नर प्रिन्स खालिद अल-फैझल यांनी डॉ. नाईक यांच्या पुरस्काराची घोषणा केली. अरेबिकमधील हस्तलिखित सन्मानपत्र, शुद्ध सोन्याचे २०० ग्रॅमचे पदक आणि साडेसात लाख सौदी रियाल (एक लाख ९१ हजार ९१० अमेरिकन डॉलर) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

उस्ताद गुलाम हसन शग्गन

9 Feb 2015
घराण्याचे नाव- ग्वाल्हेर, संगीताचा प्रकार- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, कार्यक्षेत्र- पाकिस्तान. या तीनही गोष्टी एकाच तागडीत घालण्याची ताकद संगीतात आहे, याचा साक्षात्कार उस्ताद गुलाम हसन शग्गन यांच्या रूपाने जगभरातील संगीतरसिकांनी अनुभवला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानातील एका मोठय़ा समारंभात उस्तादजींना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तेव्हात्यांनी सादर केलेला राग अडाणा त्यांच्यातील अभिजाततेचे दर्शन घडवणारा आहे.
आशिया खंडाच्या विशिष्ट भागात ज्या संगीतशैलीचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला, त्याला हिंदुस्थानी संगीत असे नाव पडले असले, तरी त्याचा प्रचार भौगोलिक सीमा ओलांडणारा होता. ज्या विष्णू दिगंबर पलुस्करांनी भारतीय संगीताची पताका फडकवण्यासाठी कन्याकुमारी ते कराची एवढा परिसर पिंजून काढला, त्यांच्यासाठी या सगळ्या ठिकाणची सांगीतिक परंपरा एकच होती. आरत्या किंवा बांग याच्या पलीकडे संगीताचा एक फार व्यापक असा परीघ असतो, जो सगळ्यांच्या जगण्याला काही अर्थ प्राप्त करून देण्यासही उपयोगी पडू शकतो, याचेही भान आलेले होते.
उस्ताद गुलाम हसन शग्गन यांनी आपले सारे आयुष्य ज्या रागदारी संगीताच्या सेवेत घालवले, त्या संगीताने त्यांच्या आयुष्यात कायम इंद्रधनुषी रंगांची बरसात केली. त्यांचा जन्म १९२८चा. भारत-पाकिस्तान फाळणीचे चटके त्यांनी ऐन तारुण्यात भोगलेले. संगीतासाठी हे दोन्ही देश कधीच वेगळे नाहीत आणि नव्हते. कव्वाली या संगीत प्रकारातून जे अनेकविध संगीताचे प्रवाह निर्माण झाले, त्यापैकी काही आजच्या पाकिस्तानमधील काही ठिकाणांहूनही होते. संगीताच्या शैलीचे नाव हिंदुस्थानी असले, तरी कुणाही पाकिस्तानी कलावंताच्या मनात त्या शैलीबद्दल अनादराची भावना कधीच असू शकत नाही. गुलाम हसन यांचे वडील भाई लाल मोहम्मद हेही मोठे संगीतकार. फाळणीनंतर लाहोरला स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला, परंतु संगीताने त्यांची सोबत मात्र सोडली नाही. जगभरातील अनेक देशांत ग्वाल्हेर घराण्याची पताका फडकवत ठेवणाऱ्या उस्ताद शग्गन यांना पाकिस्तान सरकारचा 'सितार ए इम्तियाज' हा मानाचा पुरस्कार मिळाला. भारतीय रसिकांनीही त्यांची खूप वाहवा करताना त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. अशा संगीतसम्राटाने दोन देशांच्या भौगोलिक सीमांच्याही पलीकडे जाऊन संगीताचा विचार केला आणि या कलेद्वारे साऱ्या जगाला स्तिमित करायला लावणारी कामगिरी केली. व्यावहारिक आणि राजकीय सीमा ओलांडून त्यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करणाऱ्या जगातील रसिकांना त्यामुळेच कमालीची हळहळ वाटते आहे.

अजयपाल सिंग बंगा

10 Feb 2015
ते उद्योग जगतातील असे गृहस्थ आहेत जे एस्किमोंना बर्फ विकून दाखवतील, बँकिंग उत्पादन खपवण्यात तर त्यांच्या कुणी जवळपासही नाही, असे ब्रिटिश बँकेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते. त्यांनीच भारतात केएफसी (केंटकी फ्राइड चिकन) व पिझ्झा हट ही उत्पादने रुजवली. नेसलेमधून सुरुवात करून बँकिंग क्षेत्रात ठसा उमटवला तसेच मास्टर कार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले.. त्यांची- म्हणजे अजयपाल सिंग बंगा यांची निवड अमेरिकेतील ओबामा प्रशासनाने आता व्यापार धोरण व वाटाघाटी समितीच्या सदस्यपदी केली आहे. अमेरिका-भारत व्यापार मंडळाचे ते अध्यक्ष आहेत.
अजयपाल सिंग यांचा जन्म पुण्यात १९६० मध्ये झाला.. विनोदाने सांगायचे तर, जन्माने महाराष्ट्रीय असूनही उद्योग-व्यवसायात त्यांनी प्रगती केली! अर्थात, अर्थशास्त्र विषयातून पदवी (बीए) शिक्षण त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून घेतले. त्यानंतर, अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतून त्यांनी एमबीए केल्यावर ते भारतात नेसले कंपनीत नोकरी करू लागले. १९८१ ते १९९४ या काळात या कंपनीच्या विक्री व व्यवस्थापन विभागात काम करताना त्यांना बराच अनुभव मिळाला. नंतर पेप्सिकोच्या भारतातील रेस्टॉरंट्सचे व्यवस्थापनही १९९४-९६ या काळात त्यांनी पाहिले. त्यानंतर १३ वर्षे त्यांनी सिटीग्रुपमध्ये काम केले. त्यानिमित्ताने त्यांना अमेरिका, युरोप, मध्यपूर्व व आफ्रिका या देशांत काम करायला मिळाले. सिटी इंटरनॅशनल ग्लोबल कंझ्युमर ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने त्यांनी गोल्डन स्टेट बँक व फर्स्ट अमेरिकन बँक, टेक्सास येथे काम केले. ग्राहकांसाठी बँकिंग हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. अतिशय स्वस्त अशी बँकिंग साधने त्यांनी तयार केली आहेत. त्यांच्या कार्यकाळात उत्तर अमेरिकेत रिटेल बँकिंगमध्ये ५० टक्के वाढ झाली.
न्यूयॉर्कमध्ये मॅनहटन भागात पत्नी व दोन मुलींसमवेत ते राहतात. 'युनिलिव्हर' समूहाचे भारतातील माजी प्रमुख मनविंदर सिंग ऊर्फ 'विंडी' बंगा हे त्यांचे ज्येष्ठ बंधू. दोघांचेही क्षेत्र एक, यश दोघांनाही मिळाले. 'जर तुम्ही वेगळा विचार करणारी चतुर माणसे निवडलीत तर तुम्ही यशस्वी होता,' असे अजयपाल त्यांचे म्हणणे आहे. नेतृत्वाबाबत त्यांचा कानमंत्र असा, की तुम्ही लोकांना त्यांनी पूर्वी जे काम केले आहे ते पाहून प्रोत्साहित केले पाहिजे. जे सामान्यपणे कुणी करीत नाही ते त्यांना करू द्या, त्यातून नक्की काही तरी चांगले, नवीन उदयास येईल यात शंका नाही.

केन्जी इकुआन

11 Feb 2015
सोया सॉसची बाटली वर निमुळती होत गेलेली असते, तिचा तळ मोठा असतो आणि मुख्य म्हणजे तिच्या झाकणाला दोन छिद्रे असतात. अगदी थोडासाच सोया सॉस हवा असेल तर या बाजूचे छिद्र आणि थोडा जास्त चालणार असेल तर त्या बाजूचे! मुख्य म्हणजे, बंद बाटलीतील द्रवपदार्थ बारीक छिद्रातून ओतताना बाटलीची जी खुळखुळ्यासारखी हलवाहलवी करावी लागते, ती सोया सॉस ओतताना मात्र कधीच करावी लागत नाही, कारण दुसरे छिद्र नेहमीच बाटलीत हवा राहावी याची काळजी घेण्यास समर्थ असते. ही बाटली अशीच असते, हे आपण सारे जण गृहीत धरून चालतो म्हणून तिच्याकडे आपले एवढे लक्ष जात नाही.. पण १९६१ साली जपानी वस्तुसंकल्पकार केन्जी इकुआन यांनी या बाटलीचे डिझाइन केले, तोवर ती तशी नव्हती. हे केन्जी इकुआन रविवारी (८ फेब्रु.) कालवश झाले, तोवर 'बुलेट ट्रेनचा डिझायनर' अशीही त्यांची ख्याती झालेली होती. वारा कापत, सणाणून धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा 'चेहरामोहरा' विमानासारखाच असणार, हे लोकांना आज पटते; पण आकार पूर्णपणे पालटण्याचे श्रेय केन्जी इकुआन यांचेच.
मानवी जीवन सुकर करण्याचे 'प्रॉडक्ट डिझाइन' वा वस्तुसंकल्पन क्षेत्राचे सर्वोच्च ध्येय केन्जी यांना सहज साधले नव्हते. त्यामागे मेहनत होती आणि एक शोकांतिकासुद्धा. टोक्यो शहरात १९२९ मध्ये जन्मलेले केन्जी १६ वर्षांचे होते, शिकण्यासाठी घरापासून दूर होते, तेव्हा हिरोशिमाहून बातमी आली.. तेथे राहणारे त्यांचे वडील आणि अख्खे कुटुंबच, अणुबॉम्बच्या आघातांत गतप्राण झाल्याची. वडिलांच्या मृत्यूनंतर केन्जी यांनी हिरोशिमाच्या जपानी बुद्ध मंदिरात संन्यासदीक्षा घेतली. झेन बुद्धपंथाचे पालन करताना त्यांना जाणीव झाली, की हे जग सुंदर करण्यासाठी काही तरी निर्माण केले पाहिजे. निर्मितीत आपला हातभार असला पाहिजे. मग टोक्योला जाऊन, तेथील राष्ट्रीय ललित कला विद्यापीठातून त्यांनी कलाशिक्षण घेतलेच, १९५६ साली अमेरिकेलाही जाऊन तेथील 'आर्ट सेंटर कॉलेज ऑफ डिझाइन'चा अभ्यासक्रम त्यांनी १९५७ मध्ये पूर्ण केला. त्याच वर्षी 'जीके इंडस्ट्रिअल डिझाइन असोसिएट्स' हा व्यवसाय त्यांनी जपानमध्ये सुरू केला. सोया सॉसनंतर तीनच वर्षांत 'अकिता शिन्केसान ट्रेन'चे डिझाइन त्यांनी केले आणि त्यानंतरची काही वर्षे 'यामाहा'च्या विविध मोटारसायकली त्यांनी संकल्पित केल्या. बैलाच्या वशिंडासारखी टाकी या मोटारसायकलींना होतीच, ती अधिक सुबक करून केन्जी यांनी मागचे आसन आणखी उंच केले.. पाठीचे दुखणे कमी करणाऱ्या या एका कृतीसाठी आज भारतातल्या हजारो तरुण बाइकस्वारांनीही केन्जी'सान' यांना दुवा द्यायला हवा.

हर्वे फाल्चिआनी

12 Feb 2015
अमेरिकेच्या एडवर्ड स्नोडेन याने तेथील एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) देश-परदेशातील लोकांची माहिती कशी चोरते याचा पर्दाफाश केला होता, त्याबद्दल त्याला देश सोडून पळ काढावा लागला पण त्याने ओबामा प्रशासनाला चांगलेच हादरवले हे खरे. आता नुकतीच भारतातील काळ्या पसेवाल्या खातेदारांची एक यादी 'दी इंडियन एक्स्प्रेस'ने 'इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिझम' या संस्थेच्या हवाल्याने दिली आहे. त्यामागे जो जागल्या (व्हिसलब्लोअर) आहे व ज्याने गुप्तहेरासारखे काम करून एचएसबीसीच्या स्विस बँकेतील धनिक मंडळींची माहिती उघड केली आहे त्याचे नाव आहे हर्वे फाल्चिआनी. अनेक धोके पत्करून एचएसबीसीतील किमान १ लाख तीस हजार खातेदारांची माहिती त्याने बाहेर काढली.
हर्वेचा जन्म मोनॅको या कुणाला माहीत नसलेल्या देशातील माँटे कार्लो येथे ९ जानेवारी १९७२ रोजी झाला. स्वित्र्झलडमध्ये असताना त्याला डिसेंबर २०१४ मध्ये बँक माहिती चोरीच्या प्रकरणात महाधिवक्त्यांनी अडकवले. त्याने १८० अब्ज युरोची करचुकवेगिरी आतापर्यंत उघडकीस आणली आहे. जीनिव्हा येथे २००६ मध्ये तो एचएसबीसी या खासगी बँकेत कामाला होता. २००८ मध्ये तो लेबनॉनला गेला व एचएसबीसीमध्ये सहकारी असलेल्या जॉर्जनिा मिखाएल हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध होते, नंतर तीच त्याच्यावर उलटली. तिने हर्वेवर बदनामीचे अनेक खटले टाकले. २००७ मध्ये इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संघटनेने हर्वेची मदत घेण्याचे ठरवले व दहशतवादी संघटनांचे किती पसे कुठे आहेत, ही माहिती गोळा करण्याची कामगिरी त्याला दिली. तो परत जीनिव्हात आला तेव्हा २२ डिसेंबर २००८ मध्ये त्याला अटक करण्यात आली, पण त्याने तेथे नंतर पत्नी व मुलीसह फ्रान्सला पलायन केले. फ्रान्सने काळ्या पशाची त्याने मिळवलेली माहिती इतर देशांमध्ये तिळगूळ वाटावा तशी वाटली. नंतर एचएसबीसीला १.९ अब्ज डॉलरचा दंडही झाला. 'ल माँद' या वृत्तपत्राने ही माहिती प्रथम २०१४च्या जानेवारीत खातेदारांच्या नावाशिवाय छापली. मेक्सिकोतील अमली पदार्थ माफियांचे लाखो डॉलर या बँकेत आहेत, असे यात निष्पन्न झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख असलेल्या ख्रिस्तीन लगार्द यांनी अनेकदा हर्वे याने दिलेली माहितीच वापरली होती. त्या यादीला 'लगार्द लिस्ट' असे नावच आहे.  हर्वे चोर की साव, याबाबत सध्या मतभेद आहेत. काळ्या पैशाबाबत माहिती बाहेर काढण्यासाठी त्याने व्यक्तिगत सुरक्षा पणाला लावली, हे मात्र निर्विवाद!

जॉन व्हाइटहेड

13 Feb 2015
अमेरिकेचे माजी परराष्ट्र उपमंत्री आणि गोल्डमन सॅक्स या बँकेचे माजी अध्यक्ष ही जॉन व्हाइटहेड यांनी भूषविलेली सर्वोच्च पदे होती. मात्र अन्य अनेक पदे त्यांच्याकडे चालत आली, ती त्यांनी स्वीकारली आणि कामही करून दाखविले. त्यामुळेच  वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर अनेक स्तरांतील लोकांनी त्यांना आदरांजली वाहिली. रोनाल्ड रेगन या अमेरिकी अध्यक्षांचे एक सहकारी किंवा गोल्डमन सॅक्ससारख्या गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष यापेक्षा कॉपरेरेट जगात राहूनही समाजभावी काम करणारे सहृदय नेते ही त्यांची ओळख अधिक झळाळून उठली.
'संधीची वाट पाहायची नसते, ती आपणच हेरायची असते' हे गोल्डमन सॅक्सद्वारे अनेक कंपन्या विकत घेणाऱ्या वा दुसऱ्या कंपनीत विलीन करणाऱ्या व्हाइटहेडना माहीत होतेच. 'कोणकोणत्या कंपन्यांना विलीन होणे बरे वाटेल, अशांची यादीच करून ठेवावी आपण आपल्याकडे' असे या 'मर्जर-किंग' ठरलेल्या व्हाइटहेड यांनी तरुण सहकाऱ्यास सांगितल्याची नोंद 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'कडे आहे. पण व्हाइटहेड यांनी स्वत:च्या तरुणपणी संधी साधली, ती देशसेवेची. दुसऱ्या महायुद्धाचा अखेरचा अध्याय ठरलेल्या 'नर्ॉमडी लँडिंग'मधील एक विमान उतरविणारे वैमानिक, असा त्यांचा लौकिक आहे. महायुद्ध संपल्यावर अमेरिकेचे वाढते व्यापारी महत्त्व जाणून त्यांनी हार्वर्डमध्ये प्रवेश घेतला. तेथून ते गोल्डमन सॅक्सच्या चाकरीत लागले, तेव्हा त्यांचा पगार होता वर्षांला ३६०० डॉलर. तेव्हा या बँकेत एकंदर कर्मचारी होते ३००. याच संस्थेत १९४७ पासून ३८ वर्षे ते होते.  १९८० च्या दशकात त्यांना न्यूयॉर्क शेअर बाजाराच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यपद, अमेरिकी 'फेड'च्या १२ राज्यशाखांपैकी सर्वात बलाढय़ अशा 'फेडरल रिझव्‍‌र्ह बँक ऑफ न्यूयॉर्क'चे अध्यक्षपद अशी पदेही मिळाली. मात्र आर्थिक विश्वातील एवढी महत्त्वाची पदे काबीज करणाऱ्यांच्या स्वभावातील चढेलपणा व्हाइटहेड यांच्याकडे नव्हता. 'एशिया सोसायटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अमेरिकेचे आशिया खंडाशी नाते समृद्ध करणाऱ्या संस्थेचे 'तहहयात (किंवा 'सुप्रतिष्ठ') अध्यक्ष' असे एक पद त्यांच्याकडे होते. या संस्थेचे ते एक महत्त्वाचे देणगीदार आणि विश्वस्तही होते. पत्नी नॅन्सी हिचे स्मरण म्हणून वॉशिंग्टनच्या बेघरांसाठी एक भलेमोठे वसतिगृह त्यांनी बांधले. '९/११'च्या स्मृती समितीला त्यांचे नेतृत्व आणि देणग्याही लाभल्या. हा दानशूरपणा तरुणांमध्ये यावा, यासाठी अनेक व्याख्यानेही त्यांनी दिली होती.

गुरप्रीत सिंग

14 Feb 2015
नॅशनल सायन्स फाऊंडेशनतर्फे सन्मानित करण्यात येणाऱ्या पुरस्कारावर यंदा भारतीय अमेरिकन वैज्ञानिक गुरप्रीत सिंग यांनी नाव कोरले. पाच लाख अमेरिकन डॉलरचा हा पुरस्कार त्यांनी केलेल्या नॅनोशीट्समधील संशोधनासाठी मिळाला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराच्या रकमेतून शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या त्यांच्या कामाला  तसेच संशोधनाला चालना मिळणार आहे.
मोबाइलपासून अनेक उपकरणे वापरण्यासाठी उपयोगात येत असलेल्या बॅटरीची क्षमता वाढविण्यासाठी देशभरात संशोधने सुरू आहेत. यातील संशोधनाचाच भाग म्हणून सिंग यांनी अतिपातळ धातू पत्रा तयार केला आहे. ज्याच्यापासून जास्त क्षमतेच्या रिचार्जेबल बॅटरीज, सुपरकपॅसिटर्स आणि फोटोइलेक्ट्रोकेमिकल हायड्रोजनच्या निर्मितीसाठी आवश्यक उत्प्रेरक तयार करणे शक्य होणार आहे. त्यांच्या या संशोधनांमुळे धातू विज्ञानातील त्याचबरोबरीने नॅनो तंत्रज्ञानातील अनेक पैलू जगासमोर येण्यास मदत होणार आहे. ऊर्जेच्या वापरासाठी नॅनोशीट्सची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर होणे गरजेचे आहे. यामध्ये रिचार्जेबल बॅटरीचाही समावेश आहे. ही निर्मिती करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांचा फारसा उपयोग होऊ शकत नाही. यामुळे सिंग यांनी मांडलेला सिद्धांत याचबरोबर त्यांनी केलेल्या संशोधनावरून हे शक्य असल्याचे उघड झाले आहे. ज्या वेळेस आपण ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांकडे पाहतो त्या वेळेस त्यातून निर्माण होणारी ऊर्जा साठवून त्याचे वितरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा असणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी नॅनोशीट्सचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते असे सिंग यांनी स्पष्ट केले. सिंग यांना नॅनोतंत्रज्ञानात विशेष रस असून त्यांनी पदवी शिक्षणानंतर या क्षेत्राकडेच आपला मोर्चा वळविला.  सिंग हे मूळचे भारतीय असून त्यांचे पदवी शिक्षण पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. तेथे त्यांनी मॅकॅनिकल शाखेतून २००३मध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवली. यानंतर २००६मध्ये कोलोरॉडो विद्यापीठातून त्यांनी एमएसचे शिक्षण पूर्ण केले व पुढे २००७ मध्ये त्याच विद्यापीठातून पीएच.डी.ही केली. यानंतर त्यांनी वर्जिनिया तंत्रनिकेतन विद्यापीठात अध्यापनास सुरुवात केली. त्यांचा अध्यापनाचा प्रवास अद्याप सुरू असून सध्या ते कन्सास स्टेट विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकॅनिकल आणि अणू अभियांत्रिकी शाखेत सहप्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे आत्तापर्यंत २५ हून अधिक प्रबंध सादर झाले असून त्यांनी तीन पुस्तकेही लिहिली आहेत.